धार्मिक

573 वर्षाची परंपरा असलेला जव्हारचा प्रसिद्ध शाही उरूस

जव्हार: जव्हार संस्थानाला सहाशे वर्षांची वंशपरंपरा लाभलेली आहे. येथील प्राचीन इतिहास हा अतिशय प्रेरणादायी आहे. या संस्थानात आदिवासी राजांनी वंशपरंपरागत राज्य केले असून, नागरिकांच्या दृष्टीने अनेक पायाभूत सुविधांची चोख व्यवस्था, ही राज घराण्यापासून करण्यात आली आहे, की ज्या सुखसोयी गेल्या चार पिढ्यांपासून अनुभवली जात आहे. या संस्थानातील अतिशय प्राचीन व सर्व धर्म समावेशक सामाजिक सलोख्याचा उरूस अतिशय आनंदाने व श्रध्देने साजरा केला जात असतो. यंदा जव्हार शहरात पाचशे एकात्तर वर्षाची परंपरा असलेल्या शाही उरुसाला १२ सप्टेंबर  ला सुरूवात होऊन १४  सप्टेंबर तारखेपर्यंत इस्लामिक पद्धतीने संदल , चादर, लंगर व कव्वालीच्या बहारदार कार्यक्रमात उरूस जल्लोषात साजरा होणार आहे. त्यासाठी स्थानिक मुस्लिम जमातिची उरूस कमिटी, नगर परिषद व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे मुस्लिम जमात उरूस समितीचे अध्यक्ष अयुब पठाण यांनी सांगितले.

जव्हार शहराला असलेली संस्थानाची पार्श्वभूमी ते पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर तर राज्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून लाभलेली नैसर्गिक संपदा म्हणून या शहराचा उल्लेख आहे. परंतु प्रति महाबळेश्वराच्या उल्लेखापेक्षा संस्थानाची गौरवशाली पार्श्वभूमी लाभलेली टुमदार नगरी हा उल्लेख तमाम जव्हारकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे . या शहराला राजाश्रय लाभल्याने अनेक चांगल्या परंपरा , रुढी येथे अनेक काळापासून आजही चालू आहेत . यात विशेष उल्लेख करायचा झाल्यास जव्हारचा सुप्रसिद्ध उरुस हा होय. मुस्लिम आणि सर्व धर्मीय बांधव एकोप्याने हा उरुस वंशपरंपरागत साजरा करीत आले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणूनही त्याची नोंद आहे .
हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दीन चिस्ती यांचा हा उरुस ज्याची मूळ मजार ही इगतपुरी तालुक्यातील मौजे पिंपरी सद्रोद्दीन येथे स्थित आहे. मराठी भाद्रपदमध्ये येणार्‍या कोणत्याही उर्दु महिन्याच्या २० तारखेनुसार आणि जव्हार येथे परंपरागत एक दिवस अगोदर उरूस संयुक्तरित्या साजरा केला जातो. वंशपरंपरांगत हे पुढे आजही चालू आहे.
यावेळी मुंबई, पालघर , तारापूर , डहाणू , नाशिक , वसई आदि ठिकाणांहून भाविक येतात . तर जव्हारमधील मान्यवर, मुस्लिम बांधव व सर्व धर्मीय एकोप्याने या उरुसात मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या दर्ग्याच्या उरुसाची तारीख ही इगतपुरीच्या मौजे पिंपरी येथील दर्ग्यावरून घेण्यात येते असे जाणकार मंडळींनी सांगितले.